
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा शालेय शिक्षण ऑनलाइन झाले आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अशी शंका उपस्थित होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असून, त्या वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता १५ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे. शाळांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन करून त्या घ्यायच्या आहेत. मात्र लेखी परीक्षा यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या तरी ठरलेल्या नियोजनात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी सांगितले. गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. या शैक्षणिक वर्षाचे सर्व वर्ग १५ जूनला ऑनलाइन सुरू करण्यात आले आहेत; तसेच चार ऑक्टोबरपासून राज्यातील काही भागांत दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले होते. यामुळे मागील महिन्यात मंडळाने दहावी व बारावीचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च, तर बारावीची लेखी चार मार्चपासून सुरू होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. दोन लाख विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रतीक्षा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीत असलेल्या व आता दहावीत गेलेल्या आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांची तफावत दिसत आहे. गेल्या वर्षीच्या युडायस नोंदणीप्रमाणे नववीत १८ लाख ९५ हजार ३९८ विद्यार्थी शिकत होते. या सर्व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठविण्यात आल्याने हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. यामध्ये राज्य मंडळ वगळून इतर मंडळाचे सुमारे ९५ हजार विद्यार्थी वजा केले, तरी राज्य मंडळाच्या शाळांतील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १८ लाख विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत अद्याप १६ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनीच दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केली आहे. यंदा परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत नोंदणी करण्याची म]भा दिली आहे यामुळे यात आणखी दहा हजारांची भर पडू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. तरीही दोन लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले का, याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. बारावीला आतापर्यंत १४ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-will-be-conducted-on-offline-mode-only-clarifies-maharashtra-board/articleshow/88846198.cms
0 टिप्पण्या