Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-01-31T19:48:36Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

यूपीएससीची तयारी : नागरी सेवा परीक्षेच्या उत्क्रांतीमधील मैलाचे दगड

Advertisement

– विक्रांत भोसले

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे (Civil Services Examination) स्वरूप जे आज आपल्याला दिसते आहे ते तसे अचानक उदयास आले नाही. या परीक्षेमध्ये लोकसेवा कल चाचणीचा अंतर्भाव करेपर्यंतच्या बदलांचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.

आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नागरी सेवा परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात येत नव्हती. त्या वेळी फक्त एक लेखी मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत असे परीक्षेचे स्वरूप होते. याचे कारण त्या वेळी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ही चार हजारांपेक्षाही कमी होती. लेखी परीक्षेमध्ये प्रत्येकी १५० गुणांचे सामान्य इंग्रजी, निबंध आणि सामान्य ज्ञान असे तीन पेपर होते. याशिवाय  IAS आणि  कार साठी ५,  IFS साठी २, आणि  IPS Central Services साठी ३ वैकल्पिक विषय घ्यावे लागत होते. सन १९६९ मध्ये उमेदवारांना निबंध आणि सामान्य ज्ञान हे पेपर लिहिण्यासाठी भारतीय संविधानातील आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांचा वापर करण्याची सवलत देण्यात आली. सन १९७४ ते १९७७ या काळात नेमण्यात आलेल्या कोठारी आयोगाने पूर्वपरीक्षेचा अंतर्भाव करण्याची आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलण्याची शिफारस केली. याच आधारावर सन १९७९ मध्ये पूर्वपरीक्षेचा अंतर्भाव करण्यात आला आणि मुख्य परीक्षेमध्ये निबंध वगळण्यात आला आणि सामान्य अध्ययनाचे दोन पेपर आणि दोन वैकल्पिक विषय ठेवण्यात आले.

सन १९८८-८९ या काळात नेमण्यात आलेल्या सतीश चंद्र समितीने मुख्य परीक्षेमध्ये २०० गुणांसाठी निबंध परत अंतर्भूत करण्याची शिफारस केली. सन २००१ मध्ये वाय. के. अलघ समितीने कल चाचणीचा अंतर्भाव करण्याची आणि मुख्य परीक्षेची संरचना बदलण्याची शिफारस केली. सन २००९ मध्ये एस. के. खन्ना समितीने  CSAT चा अभ्यासक्रम ठरवला. सन २०११ मध्ये  CSAT चा अंतर्भाव पूर्वपरीक्षेमध्ये करण्यात आला. या चाचणीची शिफारस करताना अलघ समितीने अनेक कारणांचा उल्लेख केलेला आढळून येतो. त्यापैकी काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे : १) सध्याची परीक्षा पद्धत ही पाठांतराद्वारे संपादित केलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन करणारी आहे. यामध्ये देशाच्या विकासासाठी आणि प्रशासन प्रक्रियेसाठी आवश्यक विषयाबद्दलचा उमेदवाराच्या ज्ञानाचा आवाका आणि खोली तसेच त्याच्या विश्लेषणात्मक कौशल्याचे मूल्यमापन करता येत नाही. २) सध्याच्या परीक्षेमध्ये अशा विषयांचे ज्ञान तपासले जाते की, ज्यांचा वापर क्वचितच समस्यांच्या निवारणासाठी होतो. ३) उमेदवाराची मूल्ये, वृत्ती, सचोटी, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक कौशल्य याचे परीक्षण सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये केले जात नाही.

वरील नमूद केलेल्या कमतरतांवर मात करण्यासाठी घेण्यात आलेल्या काही उपायांपैकी ही चाचणी ( CSAT ) एक उपाय आहे. या चाचणीची संरचना सुचवताना भारतातील तसेच भारताबाहेरील  Business Schools आणि इतर संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्षमता चाचण्यांचा (Aptitude Tests) विचार करण्यात आला. कारण या चाचण्यांची पुनरावृत्ती होत नाही आणि त्यामुळे त्यांच्याद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज बांधणे कठीण असते. याचबरोबर बुद्धिमत्ता आणि क्षमता याबाबतीत उत्तम गुणवत्ता असणारे उमेदवार निवडण्यात या चाचण्या प्रभावी ठरल्या आहेत.

सन २०१२च्या पूर्वपरीक्षेनंतर उत्तर भारतामध्ये अनेक उमेदवारांनी  CSAT च्या विरोधात निषेध मोर्चे काढले. त्यांच्या मतानुसार या परीक्षेचे स्वरूप हे दक्षिण भारतातील उमेदवारांना जास्त फायदेशीर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निगवेकर समिती नेमली. या समितीच्या  अहवालानुसार  CSAT  परीक्षा ही शहरी भागातील उमेदवारांना, ग्रामीण भागातील उमेदवारांपेक्षा सोपी जाते असे मान्य करण्यात आले. त्यामुळे सन २०१४ मध्ये इंग्रजी भाषेच्या आकलनाचा भाग वगळण्यात आला आणि सन २०१५ मध्ये CSAT हा पात्रता पेपर ठरवण्यात आला. म्हणजेच पूर्वपरीक्षा उतीर्ण होण्यासाठी सामान्य अध्ययन पेपर १ मधील गुणांसोबत या विषयाच्या म्हणजेच सामान्य अध्ययन पेपर २ मध्ये कमीतकमी २०० पैकी ३३ टक्के म्हणजे ६६ गुण मिळवणे क्रमप्राप्त आहे. वरवर पाहता बऱ्याच परीक्षार्थीना हे गुण मिळवणे फारच सोपे वाटू लागले आहे. परंतु हा त्यांचा समज कसा गोड गैरसमज आहे हे आपल्याला गेल्या तीन वर्षांमधील विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या वाढत्या काठीण्यपातळीवरून आणि हा गैरसमज करवून घेत या विषयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून लक्षात येतो.

या चाचणीच्या अभ्यासक्रमातील प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत : आकलन व इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता, तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता, सामान्य बौद्धिक क्षमता, पायाभूत अंकगणित, माहितीचा अर्थ लावणे आणि माहितीची पर्याप्तता, आंतरवैयक्तिक कौशल्य व संभाषण कौशल्य. पुढील लेखामध्ये आपण  CSAT  या विषयाची मागणी आणि विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे घटकांनुसार विश्लेषण अभ्यासणार आहोत.

The post यूपीएससीची तयारी : नागरी सेवा परीक्षेच्या उत्क्रांतीमधील मैलाचे दगड appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : नागरी सेवा परीक्षेच्या उत्क्रांतीमधील मैलाचे दगडhttps://ift.tt/HFMnlbwGz