Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य विभागाच्या 'क गट' संवर्गातील पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी आरोग्य विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोग्य विभागाचा सहसंचालक महेश बोटले (वय ५३, रा. मुंबई), लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (वय ५०), अंबाजोगाई मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड (३६) आणि श्याम मस्के (३८, तिघेही रा. अंबाजोगाई) अशी पोलिस कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना पूर्वी आरोग्य विभागाच्या 'ड गट' संवर्गातील पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्यांच्यावर दुसरा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असून, त्यांच्याकडे संबंधित विभागाच्या भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आरोपींनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून, त्यांच्या ताब्यातील प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच इतर साथीदारांच्या मदतीने परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपर्यंत पोहोचविल्या आणि त्यातून आर्थिक लाभ मिळविला आहे, असे सायबर पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. हेही वाचा: आरोपींनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फोडून त्या पेनड्राइव्हमधून इतर साथीदारांमार्फत उमेदवारांना पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा पेनड्राइव्ह हस्तगत करायचा आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिकेच्या छापील अथवा हस्तलिखित प्रती काढल्या आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. आरोपींनी किती उमेदवारांना प्रश्नपत्रिका दिल्या, याबाबत तपास करून त्यांची नावे निष्पन्न करायची आहेत. साखळीची उकल करण्यासाठी कोठडीची मागणी या प्रकरणात आरोपींना किती आर्थिक लाभ झाला, त्यांचे आणखी कोणी एजंट, साथीदार आहेत का, याबाबत तपास करून, पेपर फोडून विविध उमेदवारांपर्यंत पोहोचविणाऱ्या साखळीची उकल करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. हेही वाचा: हेही वाचा: हेही वाचा:
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-health-department-exam-paper-leak-four-arrested-including-three-senior-officers-from-department/articleshow/89818836.cms