Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी २६, २०२२ WIB
Last Updated 2022-02-26T08:00:38Z
Rojgar

शिक्षकाविना शाळेला पालकांनी ठोकले टाळे!

Advertisement
म. टा. वृत्तसेवा, शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत, या मागणीकडे शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामु‌ळे संतापलेल्या पालकांनी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील 'आयएसओ मानांकित 'कान्द्रेभुरे शाळेला अखेर टाळे ठोकले. येत्या चार दिवसांत शिक्षण विभागाने याबाबत पाऊल न उचलल्यास पालघर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे उतरती कळा लागली आहे. सफाळे पश्चिमेकडील कान्द्रेभुरे या दुर्गम भागात हीच स्थिती आहे. पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद कान्द्रेभुरे या शाळेत ६५ विद्यार्थी शिकत असून चार शिक्षकांची आवश्यकता असतानाही पालघरच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षकच दिलेले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीनेही मागील दोन वर्षांपासून शाळेला पदवीधर शिक्षकासह अन्य शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने तात्पुरते शिक्षक दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. पाच वर्षांपूर्वी जागृती चौधरी या शिक्षिकेने शाळेची धुरा हाती घेत, सर्व समस्यांवर मात करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मुलांना शिक्षण दिले, शाळेला भेडसावणाऱ्या विविध समस्या त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने सोडविल्या. मात्र, इतर सरकारी कामांच्या ओझ्यामुळे त्यांची दमछाक सुरू झाली. याच दरम्यान संतोष पाटील या कायमस्वरूपी शिक्षकाला दोन वर्षांपूर्वी या शाळेतून तिघरे शाळेत पाठविण्यात आले. मात्र शाळेच्या पटावर आजही त्यांचे नाव या शाळेतील शिक्षक म्हणूनच आहे. शिक्षणाचा भार एकाच शिक्षिकेवर आल्याने गावातील काही सुशिक्षित तरुणांनी स्वयंसेवक म्हणून अध्यापन सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी पायावरील शस्त्रक्रियेसाठी जागृती चौधरी या दोन महिन्यांच्या रजेवर गेल्या. दरम्यान, आलेल्या तात्पुरत्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण करणे, स्वतः झोपा काढणे, स्वयंसेवकांना हाकलून देणे याद्वारे शाळेचे उपक्रम धोक्यात आणले. या सर्व प्रकारानंतर हताश झालेल्या चौधरी यांनी मागील दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले, तरीही शिक्षण अधिकारी शाळेत फिरकलेच नसल्याचे पालकांनी सांगितले. सन २०१२ मध्येही शाळेला टाळे ठोकल्यानंतर पर्यायी शिक्षक देण्यात आले होते, असे माजी सरपंच आणि कांद्रेभुरे ग्रामपंचायतीच्या सदस्य तनुजा पाटील यांनी सांगितले. तर या शाळेला तात्पुरते शिक्षक पाठवतात मात्र, अधिकार नसल्याने ते कुठल्याही प्रकारे प्रशासकीय काम करत नाहीत, असे या शाळेतील सहापैकी एक स्वयंसेवक असलेले दुर्गेश भोईर यांनी सांगितले. या शाळेसाठी एकही कायमस्वरूपी शिक्षक दिलेला नाही. गेल्या दीड वर्षापासून एकच शिक्षका या शाळेवर आहे. शिक्षक मिळावा, यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला. येत्या चार दिवसांत शिक्षण विभागाने दखल घेतली नाही, तर विद्यार्थी व पालकांना पालघर पंचायत समितीसमोर आंदोलन करतील. - विष्णू पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, कान्द्रेभुरे पालघरचे गट विकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करून लवकरच शाळेला शिक्षक देतील. - लता सानप, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पालघर


source https://maharashtratimes.com/career/career-news/one-palghar-school-is-without-teacher-parents-locked-the-school-as-agitation/articleshow/89843921.cms