Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील सर्व शाळा, कार्यालये सुरू झाली, तरी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा मात्र प्रत्यक्ष सुरू झाल्या नव्हत्या. याबाबत सर्व स्तरांवरून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 'मटा'नेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर अखेर समाजकल्याण विभागाने बुधवारी सरकार निर्णय जाहीर केला. यानुसार १ मार्चपासून या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, विशेष गरजा असलेले सुमारे ४३ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. ऑनलाइन शिक्षणातील अडचण, हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. स्वमग्न, गतिमंद विद्यार्थ्यांना एका जागी बसणे शक्य नसते. यामुळे त्यांचे शिक्षणही त्याच पद्धतीने विकसित केलेले असते. ऑनलाइन शिक्षणामध्ये त्यांना सलग एका जागी बसणे अवघड जात असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले. या काळात अवघ्या २६ टक्केच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शाळा वेळेत सुरू होणे महत्त्वाचे होते. याबाबत सामाजिक संस्थांनी सरकारकडे वेळोवेळी मागण्या केल्या. यानंतर अखेर बुधवारी सरकारने निर्णय जाहीर केला. ज्याप्रमाणे शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शाळांबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतले, त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. यानुसार या शाळा १ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopening-of-children-with-special-abilities-from-1st-march-2022/articleshow/89631601.cms