Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १४, २०२२ WIB
Last Updated 2022-02-14T11:00:52Z
Rojgar

दहावी, बारावी परीक्षा २०२२: हवी आत्मविश्वासाची लस!

Advertisement
- कमलाकर विठ्ठल इंदुलकर मागील दोन वर्षांच्या करोनाकाळात अस्थिरतेचे भयपूर्ण वातावरण आपण सारेच अनुभवत आहोत. याचा सर्वाधिक दुष्परिणाम झाला तो शिक्षणावर. केजी ते पीजी सर्व स्तरांवरचे विद्यार्थी याचे शिकार ठरले आहेत. 'शाळा बंद पण शिक्षण चालू' या घोषणेनुसार सरकारने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून प्रयत्न केले असले तरी त्याची परिणामकारकता फारशी नाही, हे सर्वांनीच अनुभवले आहे. सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून २०२१च्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात पाठवले गेले. करोनापश्चात सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना यावर्षीच्या शालांत परीक्षासुद्धा ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे शिक्षण ऑनलाइन मग परीक्षा ऑफलाइन का, हा प्रश्न वरवर तर्कशुद्ध वाटला तरी सर्व नव्याने सुरळीत सुरू होत असताना परीक्षा ऑफलाइन घेणेच योग्य आहे. कारण मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते आवश्यक आहे. अवतीभवतीच्या अस्थैर्याच्या शिक्षणावर झालेल्या विपरित परिणामांमुळे परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. - शाळा नियमित सुरू असताना शिस्तबद्ध वेळापत्रकाचे पालन करताना मुलांना वेळेवर उठणे, नियमित अभ्यास करणे, शिक्षक व मित्रांकडून शंकानिरसन करून घेणे, खाण्याच्या विशिष्ट वेळांचे पालन करणे. मैदानी खेळातून शारीरिक क्षमतांचा विकास करणे आदी योग्य सवयी लागतात. लॉकडाउनमध्ये दैनंदिन वेळापत्रक पूर्ण कोलमडून गेले. त्यामुळे कधीही उठा, केव्हाही खा, मैदानी खेळांना सुट्टी. रोज नियमितपणे काही गोष्टी करण्याचा आग्रह राहिला नाही. - ऑनलाइन शिक्षणाच्या पर्यायामुळे व आग्रहामुळे पालकांना मुलांच्या हातात मोबाइल द्यावाच लागला. मात्र त्याचा अभ्यासासाठी प्रभावीपणे कसा वापर करायचा, याचे मार्गदर्शन मुलांना कुणाकडूनच न मिळाल्याने मोबाइलचा मनोरंजनासाठी वापर करण्याकडे त्यांचा कल वाढला. मोबाइलवरील खेळांमध्ये गुंतून गेल्याने व मोबाइलच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाली, खेळ कमी झाले. परिणामी स्थूलपणा वाढण्यासह आभासी विश्वात वावरल्यामुळे मुलांचे वास्तवातील जगाच भान सुटले आहे. - लॉकडाउनकाळात अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन सारेच ऑनलाइन झाल्यामुळे मुलांची लेखनाची सवय सुटली. सरावाअभावी लिखाणाचा मुलांना कंटाळा वाटू लागला. त्यामुळे अर्थातच लेखी परीक्षेची मुलांना भीती वाटणे स्वाभाविक आहे. - ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक मूलभूत संकल्पना मुलांना स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे आधीच्याच वर्षीचा अभ्यास व्यवस्थित न झाल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची उमेद मुले हरवून बसली आहेत. शैक्षणिक प्रवासात दहावी-बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कुठल्याही परीक्षेतील यश केवळ आत्मविश्वासाच्या बळावर खेचून आणता येते, हे वैश्विक सत्य आहे. मात्र आज परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये आढळत नाही. अशावेळी त्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. - शिक्षण विभागाने मुलांच्या हिताच्या दृष्टीने अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग वगळला आहे. त्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मुलांना अभ्यासासाठी वेळ तेवढाच मिळाला. मात्र प्रत्यक्ष अभ्यासक्रम कमी आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने मुलांना नक्कीच फायदेशीर आहे. - प्रात्यक्षिक परीक्षांमधील अभ्यासक्रम कमी व सोपा केला असल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनात अधिकाधिक गुण मिळवणे सहज शक्य आहे. - मुलांमधील लेखनकौशल्याच्या अभावाची दखल घेऊन शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ देऊ केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका लिहून सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. - दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्य दडपण असते ते परीक्षाकेंद्राचे. ते दूर करण्यासाठी त्यांना स्वतःचीच शाळा केंद्र म्हणून देण्यात येणार आहे. हेसुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताचेच आहे. - परीक्षेत उत्तम यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्याला योग्य कृती करायची प्रेरणा व दिशा मिळेल. विद्यार्थ्यांनी स्वतःसमोर निश्चित ध्येय ठेवणे आवश्यक आहे. परीक्षेत एकूण किती टक्के व प्रत्येक विषयात किती गुण मिळवायचे हे प्रत्येकाने स्वतःपुरते ठरवायला हवे. ते ठरवताना स्वतःच्या क्षमतेचा विचार करून त्यांचा अधिकाधिक वापर करायला हवा. धावण्याच्या शर्यतीत शेवटच्या टप्प्यात वेग वाढवणारा नेहमीच जिंकतो. तसेच या शेवटच्या टप्प्यात अभ्यासाचा वेग वाढवून विद्यार्थी परीक्षेत सहज यशस्वी ठरू शकतो. त्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या तिन्ही गोष्टी परीक्षेचाच भाग आहे. परीक्षेच्या शेवटच्या पेपरपर्यंतचा वेळ प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात आहे. याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी परीक्षा संपेपर्यंत मोबाइल, टीव्हीचा वापर विद्यार्थ्यांनी पूर्णतः टाळायला हवा. अभ्यासाची काही तंत्र पाठ्यपुस्तकाचे काटेकोर वाचन व अभ्यास परीक्षेतील यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतर नोटस् किंवा पुस्तके अवांतर मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरतात. पाठ्यपुस्तक वाचताना समजून घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणे, संबंधित संकल्पना चित्रस्वरूपात डोळ्यांसमोर आणणे, माइंड मॅप बनविणे या तंत्राचा वापर करून पाठ्यपुस्तकाचा अभ्यास उत्तमरितीने करता येतो. आपले शिक्षक, मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने न समजलेल्या गोष्टी समजावून घेणे, त्यांच्या अनुभवांच्या आधारे कमी वेळात अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यास करताना आवडीच्या विषयाचा व सोप्या भागाचा अभ्यास प्रथम करावा. सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र परीक्षेचा अभ्यास करताना व प्रश्नपत्रिका सोडवतानाही आवर्जून वापरावे. मुख्य मुद्दे लिहून अभ्यासाचा सराव करावा. प्रत्येक विषयाची किमान एक नमूना प्रश्नपत्रिका सोडवून सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान काय करावे? तणावमुक्त राहा, काळजी करू नका. वेळेआधी परीक्षाकेंद्रात पोहोचले पाहिजे, याची दक्षता घ्या. प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा व उत्तरपत्रिकेवर आवश्यक माहिती अचूकपणे भरा. प्रश्नपत्रिका सोडवताना योग्य प्रश्न क्रमांक लिहा. महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा. उत्तरपत्रिका पूर्ण लिहून झाल्यावर एकदा वाचा. काही चुका असल्यास आवर्जून दुरुस्त करा. अंतर्गत मूल्यमापनात अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. बोर्डाच्या परीक्षेचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाची लस मिळणे आवश्यक आहे. अर्थात, पालक व शिक्षक यांची भूमिका यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (लेखक रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर येथे प्राध्यापक आहेत.)


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-hsc-exam-2022-tips-for-students-to-prepare-for-exam/articleshow/89563337.cms