
Maharashtra SSC HSC Exam: दहावी, बारावी ऑनलाइन परीक्षा अशक्य
मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२
Comment

म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन स्वरूपातच घ्यावी, या मागणीसाठी पुण्यात राज्य मंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर आणि निगडीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; पण मुंबईच्या तुलनेत पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या अगदीच तुरळक होती. परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ लाखांपेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा होईल अशी व्यवस्था उपलब्ध आहे का, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. आंदोलनकर्त्यांनी परीक्षांबाबत ठोस पर्याय सुचवावा, असा टोलाही शिक्षण अभ्यासकांकडून लगावण्यात येत आहे. शहरातील मोजक्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करून आंदोलने केली. काही वेळ ही आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना पांगवले. राज्यभरात होणाऱ्या या आंदोलनावर शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ लाख आहे. या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्याची व्यवस्थाच राज्यात नाही. ही व्यवस्था निर्माण करायला जवळपास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. व्यवस्था जरी तयारी झाली तरी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्नही तज्ज्ञ विचारत आहेत. 'परीक्षा वेळेतच होणार' सोमवारी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या विरोधात आंदोलन केले असले, तरी परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने आणि ठरलेल्या वेळेतच होणार, अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांचे म्होरके आता काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोणीही एक दिवस अचानक उठले आणि परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणले तर ते शक्य आहे का? इतक्या चुकीच्या मागणीसाठी हजारो मुले रस्त्यावर येणे अत्यंत धोकादायक आहे. हे आंदोलन एका दिवसात झालेले नसून हे कोणी तरी घडवत आहे. याचा शोध घ्यायला हवा आणि परीक्षा वेळेतच व्हायला हव्यात. - धनंजय कुलकर्णी, शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक कोणताही स्पष्ट पर्याय न देता फक्त परीक्षा रद्द करा, परीक्षा ऑनलाइन घ्या, विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा, अशी विधाने लोकप्रियतेसाठी ठीक आहेत. वास्तवात त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. शिक्षण विभाग परीक्षांबाबतीत टप्प्याटप्याने निर्णय घेत आहे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते समाधानकारक वातावरण निर्माण झालेले असतानाच अशी दिशाभूल होणे धक्कादायक आहे. - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-online-exam-not-possible-says-education-experts/articleshow/89263232.cms
0 Response to "Maharashtra SSC HSC Exam: दहावी, बारावी ऑनलाइन परीक्षा अशक्य"
टिप्पणी पोस्ट करा