Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला () आज, शुक्रवारपासून (चार मार्च) सुरुवात होत असून, या परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे नऊ हजार ६३५ परीक्षा केंद्रांवर परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. करोना प्रादुर्भावामुळे परीक्षेच्या केंद्रांत वाढ करण्यात आली असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, विशेष महिला पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे जात आहेत. करोनाच्या सावटामुळे परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंडळाकडून नेहमीप्रमाणे लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीत होत आहे. यंदा १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या नऊ विभागीय मंडळातील एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी बुधवारी (तीन मार्च) सकाळी ११ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज विलंब शुल्क न आकारता स्वीकारण्यात आले. मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात येणारे नैराश्य, दडपण दूर करण्यासाठी दहा समुपदेशकांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केलेले छापील वेळापत्रक ग्राह्य धरावे; तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. नोंदणी झालेले विद्यार्थी (शाखानिहाय) विज्ञान : ६ लाख ३२ हजार ९९४ कला : ४ लाख ३७ हजार ३३६ वाणिज्य : ३ लाख ६४ हजार ३६२ व्यावसायिक अभ्यासक्रम : ५० हजार २०२ टेक्निकल सायन्स : ९३२ विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे - शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र आणि उपकेंद्र - यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचे आयोजन - ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ - ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ - कोव्हिड-१९ संदर्भात सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना - एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकीट - सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची छपाई - माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन - प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-hsc-12th-exam-2022-to-begin-from-today-4th-march-2022-at-over-9-thousand-centers-in-maharashtra/articleshow/89982220.cms