Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ११ मार्च, २०२२, मार्च ११, २०२२ WIB
Last Updated 2022-03-11T08:00:40Z
Rojgar

मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर; MPSC चा नवा पायंडा

Advertisement
मुंबई: राज्याच्या आरोग्य सेवेतील अधिष्ठाता, उपसंचालक पदांसह विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राध्यापकांच्या अतिविशेषीकृत ३४ पदांच्या भरतीची प्रक्रिया गतिमान करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने () नवा पायंडा पाडला आहे. या पदांच्या भरतीसाठी मुलाखती झाल्या त्याच दिवशी आयोगाने निकाल जाहीर केला आहे. भरती प्रक्रिया गतिमान करण्यावर आयोगाने भर दिला असून त्याचाच भाग म्हणून हा नवा उपक्रम सुरू केला आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरतीची प्रक्रिया गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे. आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच किशोरराजे निंबाळकर प्रक्रियेत लक्ष घालत आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा अराजपत्रित पदांसाठीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या केंद्रांवर स्वतः भेटी देऊन प्रक्रियेवर लक्ष ठेवले आहे. राज्य शासनाने विविध शासकीय विभागांमधील राजपत्रित/अराजपत्रित भरतीची मागणीपत्रे आयोगाकडे पाठवली असून त्याप्रमाणात आयोगाने भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु केली आहे. प्राप्त अर्जांची छाननी, प्रमाणपत्र पडताळणी सेवाप्रवेश नियमानुसार तपासणीला गती दिली असून या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता आणि परीक्षा नियोजनात सुसुत्रता या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र, नवजात शिशुरोगशास्त्र, अंतस्त्रावी विकारशास्त्र,जठारांत्रजन्यशास्त्र, वृक्क विकारशास्त्र, हृदयवाहिका आणि उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र, बालरोग शल्यचिकित्साशास्त्र, मुत्रविकारशास्त्र, सुघटन शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग चिकित्साशास्त्र तसेच शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयासाठी अधिष्ठाता, आरोग्य सेवा उपसंचालक, औषधवैद्यकशास्त्र, मंजातंतू शल्यचिकित्साशास्त्र, अतिविशेषीकृत विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण ३४ पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या. या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पाडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधीत पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले असून ही बाब आयोगाची गतिमानता दर्शविणारी असल्याचे सांगून अनेक वर्षांपासून रिक्त असणारी अतिविशेषीकृत पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विशेष मोहिम राबवून भरली आहेत, असेही . निंबाळकर यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-declared-exam-result-on-the-final-interview-day-itself/articleshow/90141904.cms