Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ८ जानेवारी, २०२२, जानेवारी ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-01-08T08:00:51Z
Rojgar

पुणे पालिका शाळांमधील ३० हजार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या साधनांविना

Advertisement
: पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शा‌ळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक 'डिव्हाइस' उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचवायचे, हे आव्हान शिक्षकांपुढे उभे ठाकले आहे. 'डिव्हाइस' नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेच्या शहरातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या गटात ९० हजार मुले शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य आहे का, यासाठी महापालिका शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये केवळ ६५ टक्के विद्यार्थ्यांकडेच स्मार्ट फोन, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब अशी उपकरणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी ३० हजार विद्यार्थ्यांकडे अद्याप ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्याने हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरात एकच स्मार्ट फोन उपलब्ध असतो. बऱ्याचदा हे स्मार्ट फोन घरातला कर्ता पुरुष घेऊन जातो. ज्या वेळामध्ये मुलांना ही उपकरणे उपलब्ध होतात, त्या वेळी पालिकेच्या शिक्षकांना मुलांना शिकवावे लागते. अनेक कुटुंबांत दोन मुले वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकत असतात. त्यामुळे या मुलांना एकाच वेळी शिक्षण देणे शक्य होत नाही. अशा वेळी वेगवेगळ्या वेळांना शिक्षण द्यावे लागते. असे असले तरी सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा किती विद्यार्थी ऑनलाइन वर्गांमध्ये उपस्थित राहतात, याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडे इंटरनेटचे रिचार्ज करण्यासाठीही पैसे नाहीत, असेही दिसून आले आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षण सुरू केले असले तरी त्याचा फायदा झालाच, तर तो उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या मुलांना होणार आहे. या मुलांकडे ऑनलाइन वर्गांसाठी स्वतंत्र उपकरणे आहेत. मात्र, वस्ती विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अशी उपकरणे उपलब्ध नसल्याने या वर्षी मुले त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, अशा बाबी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या गटात शिकणारी मुले -- ९० हजार ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था नाही, असे विद्यार्थी -- ३० हजार स्मार्ट फोन, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब अशा सुविधा असलेले विद्यार्थी -- ६५ टक्के स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पुढील काही महिने विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वस्ती विभागातील विद्यार्थ्यांकडे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांच्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत या मुलांपर्यंत स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप अशी उपकरणे पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण मंडळाकडून वेगवेगळे प्रयत्न अनेक मुलांकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नसल्याने शिक्षकांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा मोबाइल उपलब्ध होत असल्याने काही शिक्षक या वेळांमध्येही मुलांच्या शिकवण्या घेत आहेत. परंतु, या माध्यमातून सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणार का, हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. कोणताही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे नसल्याने त्यांना शिकवण्यासाठी अनेक अडचणी येतात. या विद्यार्थ्यांच्या वेळा पाहून आमचे काही शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी पालिकेने वस्ती विभागात काही शिक्षक पाठवून शिकवण्याची व्यवस्थाही केली होती. त्याच पद्धतीने यापुढेही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. - शुभांगी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी, पुणे महापालिका शिक्षण मंडळ


source https://maharashtratimes.com/career/career-news/over-30-thousand-students-in-pune-municipal-schools-do-not-have-digital-device-for-online-education/articleshow/88770023.cms