
RTE Admissions 2022: मुलांना 'आरटीई' तून प्रवेश मिळेल का? पालकांना पडला प्रश्न
शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२
Comment

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत () खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला पुणे जिल्ह्यात अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यातच यंदाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची नोंदणी कमी झाल्याने, प्रवेशक्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला ‘आरटीई’तून प्रवेश मिळेल का, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळा नोंदणीला पुरेसा कालावधी दिला असूनही, नोंदणी पूर्ण न झाल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी काय करीत होते, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांत आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शाळेच्या ‘एंट्री पॉइंट’ला असणाऱ्या प्रवेशक्षमतेच्या २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. या खासगी शाळांनी ‘आरटीई’च्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रवेशप्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होते. त्यानुसार १६ फेब्रवारीपासून राज्यातील २२ जिल्ह्यांत प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू झाले. मात्र, प्रवेशासाठी सर्वाधिक चुरस असणाऱ्या पुणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील पालकांना ‘आरटीई पोर्टल’वर ऑनलाइन पद्धतीने अर्जच भरता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेत अर्ज कधी भरता येईल, याबाबत पालकांकडून विचारणा होत आहे. साधारण २२ जिल्ह्यांमध्ये शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यावर, तेथे प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील शाळांची नोंदणी पूर्ण झाली नसल्याने, प्रवेशप्रक्रिया सुरू करता येत नसल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘आरटीई’च्या पोर्टलवर २०० शाळांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे प्रवेशक्षमतेत तीन हजारांनी घट कायम आहे. अशा परिस्थितीत शाळांची नोंदणी आणि प्रवेशक्षमता पूर्ववत न झाल्यास, अनेक मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने तत्परता दाखवावी ‘आरटीई’नुसार २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी पुणे शहर विभागात अजूनही शाळांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. करोनामुळे अनेक मुलांना पूर्व प्राथमिकचे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे या मुलांना थेट पहिलीत ‘आरटीई’चे प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष व्यवस्थितरीत्या पार पडावे, यासाठी आरटीई प्रवेश लवकर पूर्ण करा, अशी मागणी ‘आप पालक युनियन’च्या वतीने करण्यात आली आहे. इतर मुलांच्या तुलनेत थेट पहिलीत प्रवेश घेणारी मुले अभ्यासात मागे पडू शकतात; म्हणूनच लवकर शाळा प्रवेश होऊन किमान पुढचे शैक्षणिक वर्ष व्यवस्थित पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तत्परता दाखवायला हवी, अशी मागणी युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admissions-2022-parents-in-pune-are-waiting-for-rte/articleshow/89682157.cms
0 Response to "RTE Admissions 2022: मुलांना 'आरटीई' तून प्रवेश मिळेल का? पालकांना पडला प्रश्न"
टिप्पणी पोस्ट करा