Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमांच्या सॉफ्टवेअरसह एक टॅब देण्याचा प्रस्ताव बुधवारी (सात जुलै) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली. बैठकीत ७९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरात; तसेच राज्यातील काही भागात पूर्णतः व अंशतः लॉकडाउन चालू आहे. त्यामुळे मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांची शाळा आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. चालू शैक्षणिक वर्षातही करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. 'महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेले बहुतांशी विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांच्या पालकांची स्मार्ट फोन घेण्याची आर्थिक क्षमता नसते. याबाबत अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. पालकांची अडचण दूर करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत खंड पडू नये; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने मंजूर केलेल्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित स्पॉटवेअर ई-लर्निंग साहित्यासह टॅब देण्यात येईल,' असे लांडगे यांनी सांगितले. 'ज्या संस्थांनी जिल्हा परिषद, शिक्षण संस्था, इतर महापालिका व स्मार्ट सिटीला शालेय अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर पुरविले आहे, अशा 'बालभारती'ने मंजूर केलेल्या नामांकित संस्थेकडून पहिले ते दहावी शैक्षणिक अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर (ई-लर्निंग साहित्यासह) घेण्यास मान्यता देण्यात आली. त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी मंजुरी दिली,' असे लांडगे यांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी सुमारे ७९ कोटी १२ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड येथील दुरुस्तीच्या कामांसाठी चार कोटी ७९ लाख रुपये, विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासेसपोटी पुणे परिवहन महामंडळास तीन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या कामांचा समावेश आहे. रुग्णालयांसाठी निधी भोसरी, जिजामाता, थेरगाव व आकुर्डी रुग्णालयांकरीता आवश्यक द्रव ऑक्सिजन आणि मेडिकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पाच कोटी रुपये, वायसीएम रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाकरिता 'म्युकरमायकोसिस'वर उपयायोजना करण्यासाठी उपकरणे आणि साहित्य खरेदीसाठी एक कोटी दोन लाख रुपये खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yzMHuP
via nmkadda