Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईतील सुमारे ८३ टक्के शाळांनी त्यांचा दहावीचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे कळविला आहे. अखेरच्या दिवशी १७ टक्के शाळांचा निकाल बाकी होता. मात्र तो वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर इयत्ता नववीचे ५० पैकी गुण व दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील सराव परीक्षांचे ५० पैकी गुण अशा प्रकारे १०० पैकी गुणांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शिक्षण मंडळाने शाळांना विशेष सूत्र दिले होते. या सूत्राचा वापर करून शाळांना विद्यार्थ्यांचे गुण विशिष्ट स्वरुपात भरून मंडळाकडे सादर करायचे होते. यासाठी ३० जून ही अखेरची तारीख होती. या दिवसापर्यंत राज्यातील ९० टक्के शाळांनी दहावीच्या गुणांचा तपशील मंडळाकडे सादर केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले. मुंबईत लोकल प्रवासाची मुभा नसल्याने हे काम वेळेत होईल की नाही याबाबत शंका व्यक्त होत होती. अखेरपर्यंत दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या सर्वच शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा मिळालेली नाही. तरीही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घरून, वेळप्रसंगी विनातिकीट प्रवास करताना दंड भरून शाळा गाठली आणि हे काम पूर्ण केले. यामुळे मुंबईतील सुमारे ८३ टक्के शाळांचा तपशील मंडळाकडे पोहोचला आहे. १७ टक्के शाळांचा तपशील बाकी आहे. तोही वेळेत येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे दहावीचा निकाल नियोजित वेळेत जाहीर करणे शक्य होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. बारावी आराखड्याची प्रतीक्षाच बारावीची परीक्षा रद्द केली आहे. मात्र निकाल कसा जाहीर करावा याबाबत राज्य शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना शाळांना दिलेल्या नाहीत. यातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलैच्या आत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जर शिक्षण विभागाने वेळेत निकष जाहीर केले नाही, तर निकाल वेळेत लागणे अवघड असल्याचे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत. दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मूल्यांकनाचा आराखडा शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने निर्णय जाहीर करावा आणि शिक्षकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SIF1r1
via nmkadda