
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील नामवंत विद्यापीठे, क्रीडा विद्यापीठ, क्रीडा आणि शारिरीक शिक्षणाचे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 'एमपीएड' (, M.P.Ed) या पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (CET) अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या (CET Cell) वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. ही सीईटी दोन भागांमध्ये होणार असून, पहिल्या भागात ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा होईल. दुसरा भाग हा शारिरीक चाचणीचा असणार आहे. पहिल्या भागात प्रत्येकी एक गुणाचे ५० प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. शारिरीक शिक्षणाचा पाया, शारिरीक शिक्षणातील शिक्षण पद्धती, व्यवस्थापन, शारिरीक चाचण्या आणि त्यांचे कार्य अशा विषयांवर ही लेखी परीक्षा होईल. दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांच्या शारिरीक क्षमतेची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षाही ५० गुणांची असून, १० बाय ४ शटल रन टेस्ट, सीट अँड रीच, स्टँडिंग ब्रॉड जम्प, सीटअप्स, मेडिसीन बॉल थ्रो, या चाचण्या होतील. प्रत्येक चाचणीसाठी दहा गुण असतील. या दोन्ही परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना एकूण शंभर गुणांपैकी गुणदान केले जाणार असून, गुणवत्ता यादी ठरवताना या दोन्ही परीक्षांचा विचार केला जाणार आहे. शारिरीक चाचणी राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार असून, केंद्रे, परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर सीईटी सेलच्या वेबसाइटवर संपर्क करत राहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yXyiJk
via nmkadda
0 टिप्पण्या