Advertisement

म. टा. वृत्तसेवा, जव्हार जव्हार, मोखाडा हे तालुके आदिवासी अतिदुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात. येथे जिल्हा परिषद शाळा गावोगावी आहेत. मात्र जास्तीत जास्त प्राथमिक शाळा असून माध्यमिक शाळांची संख्या कमी आहे. त्यातही मोजक्या शाळांत नववी व दहावीचे वर्ग भरवले जातात. पालघर जिल्ह्यामध्ये ७९९ माध्यमिक शाळा आहेत. बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे, परंतु आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर नववीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो विद्यार्थी नववी, दहावीच्या प्रवेशापासून वंचित राहतात. पालघर जिल्हा हा आदिवासी ग्रामीण जिल्हा आहे. येथील लोकवस्ती ही डोंगरदऱ्यांमध्ये विखुरलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने प्रत्येक पाड्यावर प्राथमिक शाळा सुरू केल्या. परंतु या शाळा साधारण पाचवी ते आठवीपर्यंतच्या आहेत. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नववीच्या प्रवेशासाठी फार मोठी कसरत करावी लागते. माध्यमिक शिक्षण मिळावे, यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, विनाअनुदानित माध्यमिक शाळा, अशा सर्व मिळून ७९९ शाळा आहेत. परंतु या शाळा विद्यार्थ्यांच्या घरापासून साधारण १५ ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी प्रवास शक्य नसल्याने शाळेत जात नाहीत. त्यातच एका वर्गामध्ये ५० विद्यार्थी क्षमता असताना प्रत्येक वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागतो. कोणताही विद्यार्थी नववी, दहावीच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून पूर्णपणे दक्षता घेतली जाते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. अजूनही कुठे असे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी असतील तर त्यांना जवळच्या शाळेत दाखल करून घेण्यात येईल. - संगीता भागवत, शिक्षणाधिकारी माध्यमिक पालघर तालुकानिहाय माध्यमिक शाळांची संख्या डहाणू ७३ जव्हार ४० मोखाडा २४ पालघर १३१ तलासरी ४८ वसई ४०८ विक्रमगड ३२ वाडा ४३ एकूण माध्यमिक शाळा ७९९
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lQjNBW
via nmkadda