
महाराष्ट्र सरकार पुढील शैक्षणिक सत्रापासून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये द्विभाषिक पाठ्यपुस्तके आणणार आहे. ऑगस्ट २०२० पासून यावर काम करण्यात येत आहे आणि या अभ्यासक्रमाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी लहान प्रमाणात सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकार आता राज्यभरातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्या लिहितात की, 'आम्ही पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तके आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. आज वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.' द्विभाषिक पाठ्यपुस्तके सध्या प्राथमिक पातळीवर केवळ काही निवडक शाळांमध्ये आणि फक्त पहिलीसाठी प्रायोगिक तत्त्वावर वापरली जातील. हा प्रकल्प यशस्वी झाला तर राज्यातील सर्व शाळांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. 'मी बालभारतीला उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणण्याची सूचना केली आहे. ज्यांमध्ये मराठी शब्द आणि वाक्यांसोबत इंग्रजी मजकूरही दिला जाईल, जेणेकरून मुले मूलभूत इंग्रजी शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना शिकू शकतील. राज्यातील ४८८ मॉडेल स्कूलमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे,' असेही गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याख्या, रुटीन शब्द, संकल्पना, मराठी शब्दांचे सोपे इंग्रजी समानार्थी शब्द आणि वाक्यांचा वापर समजेल अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकांची रचना केली जाईल. द्विभाषिक पाठ्यपुस्तके सादर करण्याचा मुख्य उद्देश शाळेच्या दप्तराचे वजन कमी करणे आणि त्याच बरोबर स्थानिक माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेची संकल्पना स्पष्ट करणे हा आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा उच्च शिक्षणात होईल. कारण तेव्हा त्यांना मूळ भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर करताना खूप त्रास होतो.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-schools-to-introduce-bilingual-books-in-marathi-medium-schools-from-next-academic-session-informs-minister-varsha-gaikwad/articleshow/88896800.cms
0 टिप्पण्या