Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १७, २०२२ WIB
Last Updated 2022-02-17T08:00:53Z
Rojgar

युक्रेनमधील विद्यार्थी मायदेशी परतणार

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक युक्रेन आणि रशियामधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात परतण्याची सूचना दिली आहे. युक्रेनमध्ये भारतातील जवळपास १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या एक हजारच्या आसपास आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये डिसेंबरपासून संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्यानंतर हा वाद चिघळून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. त्यामुळे भारतातून युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांना भारतात परतण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी परतण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस या परदेशी विद्यापीठांमधील वैद्यकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेमार्फत देण्यता आली. अनेक विद्यार्थ्यांनी परतीची तिकिटेही बूक केली आहेत. भारतातील जवळपास २० हजार नागरिक सध्या युक्रेनमध्ये असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच १८ हजार आहे. त्यापैकी जवळपास एक हजार विद्यार्थी उत्तर महाराष्ट्रातील आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागणार असले तरी लवकरच ही परिस्थिती निवळेल, असा विश्वास संबंधित संस्थेने व्यक्त केला. मंगळवारी रात्रीपासून रशियानेही सीमेवरून सैन्य हलविण्यास सुरुवात केल्यामुळे युद्धाचा धोका कमी होत असून, विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, असे आवाहनही परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांमार्फत करण्यात येत आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/indian-student-in-ukraine-will-return-back-in-india/articleshow/89634583.cms