
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीच्या आधारेच सवलतीचे गुण मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. दहावीला चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण मिळविण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट परीक्षेला बसता येत नाही. मात्र गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये करोनामुळे एलिमेंटरी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना यंदा केवळ इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या श्रेणीच्या आधारे चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत. हा निर्णय केवळ यंदाच्या परीक्षेपुरताच लागू असणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागातर्फे शासन आदेश काढण्यात आला असून, तो केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पुरताच मर्यादित असणार आहे. ‘इंटरमिजिएट’ परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर ही परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती आता एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येणार असल्याचे संकेत कला संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-exam-2022-eligible-students-to-get-concessions-marks-on-the-basis-of-intermediate-drawing-exam/articleshow/89740094.cms
0 टिप्पण्या