यूपीएससीची तयारी : नागरी सेवा कल चाचणी

यूपीएससीची तयारी : नागरी सेवा कल चाचणी

विक्रांत भोसले

मागील लेखामध्ये आपण  CSAT  च्या विविध घटकांतील उपघटकांवर किती प्रश्न विचारले गेले होते, याचे विश्लेषण करून त्यातील काही महत्त्वाच्या उपघटकांचा अभ्यास करताना लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केली होती. या लेखामध्ये आपण  CSAT  चा पेपर सोडवताना आपली रणनीती काय असावी आणि ती आखताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, याची चर्चा करणार आहोत.

एक उत्तम रणनीती आखताना फक्त आपले ध्येय काय आहे हे माहिती असणे पुरेसे नाही. त्याचबरोबर आपल्यातील कार्यक्षमता, कौशल्य, कमतरता आणि तयारी याचा अचूक अंदाज असणे नितांत गरजेचे आहे. कारण हे जर नसेल तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी केलेले नियोजन हे सदैव सदोषच राहील. यामध्ये आपल्याला सोपे तसेच अवघड वाटणाऱ्या घटकांची आणि त्यातील विषयांची जाणीव, अपुरी तयारी असलेल्या उपघटकांची जाणीव, वाचनाचा अपेक्षित वेग आणि आपला वाचनाचा वेग, मिळवावयाच्या गुणांचे उद्धिष्ट आणि अपेक्षित अचूकता आणि त्यासाठी सोडवावयास लागणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्रश्न सोडवताना वेळ वाचवणाऱ्या पद्धती आणि या सर्वाचा विचार करून केलेले वेळेचे नियोजन इ.चा अंतर्भाव होतो. आता यातील एकेक घटकांवर आपण चर्चा करूयात.

आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे, हे ठरवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.  CSAT  हा किमान पात्रता पेपर आहे की, ज्यात कमीतकमी ६६ गुण मिळवणे आवश्यक आहे. पण त्यामुळे फक्त ६६ गुणांचे ध्येय ठेवू नये. कारण परीक्षेत आपण जे काही पर्याय उत्तर म्हणून निवडतो ते सर्वच अचूक असतीलच असे नाही वा तसा अंदाज ते पर्याय निवडताना येईलच असे नाही. म्हणून अशा नकळत चुका झाल्या तरी आपल्याला कमीतकमी गुण खात्रीशीर मिळवता येतील यासाठी मुळातच आपले ध्येय हे ६६ गुणांपेक्षा जास्त ठेवायला हवे जसे की, ८० गुण वा १०० गुण. मग हे गुण प्राप्त करण्यासाठी सोडवलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला हवीत याचा अंदाज असायला पाहिजे. सोडवलेले प्रश्न आणि विविध गुणांच्या ध्येयानुसार सोडवलेल्या प्रश्नांपैकी अपेक्षित अचूक प्रश्नांची संख्या हे दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.

जर एखाद्याने ६० प्रश्न सोडवले असतील तर ६६ गुण प्राप्त करण्यासाठी किमान ३५ प्रश्नांची उत्तरे अचूक असायला हवीत तरच  negative marking चा परीक्षेच्या निकालावर परिणाम होणार नाही. पण जर ध्येय ८० वा १०० गुणांचे असेल तर ६० प्रश्नांपैकी अनुक्रमे ३९ आणि ४५ प्रश्न अचूक असायला हवेत. मगच आपण नकळत होणाऱ्या चुकांचा निकालावर परिणाम होणार नाही. यासाठी आपल्याला सोडवणाऱ्या प्रश्नांच्या अचूकतेचा आणि प्रश्न सोडवण्याचा वेगाचा अंदाज असणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात येण्यासाठी पुरेसे सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या वाचनाचा वेग किती असायला हवा, याचा अंदाज असणे आवश्यक आहे. २०१७ च्या  CSAT  पेपरमध्ये एकूण ७८२० शब्द होते. एकदाच माहिती वाचून प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. म्हणून कमीतकमी ७० ते ८० टक्के माहिती परत डोळय़ाखालून घालावी लागते. याशिवाय आपण सर्वच वेळ फक्त वाचनात घालवत नाही तर त्यापैकी काही वेळ विचार करून उत्तर काढण्यात घालवतो. हे सर्व लक्षात घेतले की असे लक्षात येते की, आपल्या वाचनाचा वेग अंदाजे १७५ ते २०० शब्द दर मिनिट असायला पाहिजे. आता प्रत्येकाने आपापल्या वाचनाचा वेग तपासून पाहावा. आता काहीजण म्हणतील की, हा पेपर पास होण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नाही. हे बरोबर आहे. पण कोणते प्रश्न सोडवावेत आणि कोणते नाही, यासाठी प्रत्येक प्रश्नातील काही भाग वा कधीकधी सर्व भाग वाचावा तर लागेलच. मग अशावेळी प्रश्नांची निवड कशी करावी आणि कुठे कुठे वेळ वाचवता येऊ शकतो, हे आता पाहूया.

सर्वप्रथम, जर प्रश्नाचा प्रकार वा माहिती वा उताऱ्याचा विषय वा भाषेची शैली यातील काही वा सर्वच जर अपरिचयाचे वा नेहमी अवघड जाणारे असेल तर प्रश्न सोडवण्याच्या पहिल्या फेरीत अशा प्रश्नांवर वेळ घालवू नये. जर खूप साऱ्या माहितीवर अगदीच कमी प्रश्न विचारले असतील तर अशा प्रश्नांना कमी प्राधान्य द्यावे. अप्रत्यक्ष प्रश्न प्रकारासाठी  Elimination  पद्धतीचा उपयोग होतो का, हे पाहावे. ही पद्धत म्हणजे विधाने वाचण्याच्या आधी पर्याय काय दिले आहेत हे पाहावे आणि त्यांतील असे विधान शोधावे की जे जर चूक निघाले तर चारपैकी तीन पर्याय चूक ठरतात. असे विधान सापडले की पहिल्यांदा त्याची सत्यता पडताळावी, असे केल्याने बराच वेळ वाचतो.  Tally  म्हणजेच ताळा पद्धतीचा वापर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे करावा. या पद्धतीमुळे माहितीची मांडणी सविस्तर न करतादेखील अचूक पर्याय निवडता येतो. इथे दिलेल्या पर्यायांचाच वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे जर इंग्रजी भाषेवर आपली पकड पक्की नसेल तर असे प्रश्न जिथे शब्दच्छल वा समजावयास अवघड वा कधीच परिचय न झालेल्या वाक्यप्रकाराचा उपयोग केला असेल तो प्रश्न प्रकार कितीही परिचयाचा असला तरी त्याला शेवटी हाताळावे. एवढय़ा सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये यश संपादन करण्यास मदत करणारी एक उत्तम रणनीती आखणे, हे एक अत्यंत सोपे काम होईल.

The post यूपीएससीची तयारी : नागरी सेवा कल चाचणी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : नागरी सेवा कल चाचणीhttps://ift.tt/CkOIyz2

0 Response to "यूपीएससीची तयारी : नागरी सेवा कल चाचणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel