
म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोना संसर्गामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची हिवाळी २०२० परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा ३० जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत देण्यात आली. विद्यापीठामार्फत हिवाळी २०२०च्या परीक्षांचे १० ते ३० जूनदरम्यान आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यांना या परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष परीक्षा आयोजित करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाला दिला होता. त्यानुसार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, ३० जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान ही परीक्षा होणार असल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. या परीक्षेच्या निकालानंतर उन्हाळी २०२१ परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा वगळता आरोग्यशास्त्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षाही होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेबाबत सोशल माध्यमांतून जाहीर होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. राज्यभरात ८६ केंद्रांवर परीक्षा विद्यापीठामार्फत ३० जुलैपासून या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले असले, तरी किती विद्यार्थी ही परीक्षा देणार हे मात्र अद्याप निश्चित नसल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत सांगण्यात आले. महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली असून, ही यादी आल्यानंतरच हा आकडा निश्चित होणार आहे. राज्यभरातील ८६ परीक्षा केंद्रांवर ही विशेष परीक्षा होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yRxrd5
via nmkadda
0 टिप्पण्या