Advertisement

education: शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी जोडण्यात येणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून, शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कौशल्य उपक्रम समाविष्ट करण्याची तयारी केली आहे. यासोबतच उच्च शिक्षणामध्ये आधुनिक-अनुकूल कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील गरजा पूर्ण करणे तसेच शिक्षणानंतर रोजगाराची समस्या दूर करणे हा यामागचा उद्देश आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाचा कौशल्यपूर्ण अॅक्टीव्हिटींवर भर दिला जाणार आहे. सहावी ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत देण्याची योजना असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. स्किल इंडिया मिशन अंतर्गत इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या संदर्भात माध्यमिक शाळा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक या संस्थांशी करार केला जाणार आहे. सन २०२५ पर्यंत शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीतील ५० टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. व्यावसायिक आणि कौशल्य विकास योजना लागू करण्याच्या योजनेअंतर्गत, घरगुती आणि जागतिक गरजांचे आकलन करण्यासाठी उद्योगांची मदत घेतली जात आहे. जेणेकरून शिक्षणानंतर रोजगाराची समस्या दूर करण्याबरोबरच उद्योगांच्या गरजा पूर्ण करता येतील. 'शालेय शिक्षणातील नवीन युगाच्या कौशल्य विकासाखाली अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागेल. या अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, कोडिंग, डेटा सायन्स सारख्या अभ्यासक्रमांवर भर दिला जात असल्याचे' अलीकडेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते. शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा नाहीत त्या शाळा आजूबाजूच्या इतर शाळांतून या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. करिअरशी संबंधित पर्यायांवर आधारित कौशल्य आधारित एप्टीट्यूड टेस्ट आयोजित केली जाणार आहे. याचे आयोजन CBSE आणि NCERT मार्फत होणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालेय स्तरावर ५५ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. मार्च २०२१ पर्यंत १३ लाख ५० हजार १७५ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेचा लाभ मिळाला आहे. या कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये कृषी, परिधान, वाहन, बँकिंग, वित्त, विमा सेवा, सौंदर्य, आरोग्य, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, माध्यम, मनोरंजन, अनेक कौशल्ये, प्लंबर, वीज, सुरक्षा, दूरसंचार, पर्यटन आणि आदरातिथ्य, वाहतूक रसद, गोदाम यांचा समावेश आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lEtbZc
via nmkadda