Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली करोनामुळे शाळा दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे भीषण दुष्परिणाम झाले आहेत. ग्रामीण भागातील ३७ टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे थांबले असून ४८ टक्के विद्यार्थ्यांना काही मोजक्या शब्दांपलिकडे काहीही वाचता येत नसल्याचे अलिकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. 'लॉक्ड आऊट : इमर्जन्सी रिपोर्ट ऑन स्कूल एज्युकेशन' या शीर्षकाचे द स्कूल चिल्ड्रन्स ऑनलाइन अँड ऑफलाइन लर्निंग (स्कूल) यांचे सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. या अंतर्गत ऑगस्टमध्ये १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील गरीब घरांमधील एक हजार ४०० विद्यार्थ्यांची ऑगस्टमध्ये पाहणी करण्यात आली. या अहवालातून शिक्षणाचे भीषण चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागात केवळ २८ टक्के विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करत आहेत, तर ३७ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णत: दूर आहेत, असे आढळून आले. साध्या वाचनाच्या चाचणीतून समोर आलेले निष्कर्ष हे तर धोक्याची घंटा आहेत, कारण जवळजवळ निम्म्या विद्यार्थ्यांना काही शब्दांच्या पलिकडे वाचन करता आले नाही,' असे या अहवालात म्हटले आहे. शहरी भागात नियमित शिक्षण घेत असलेल्यांचे प्रमाण ४७ टक्के, शिक्षण पूर्णपणे थांबलेल्यांचे प्रमाण १९ टक्के आणि काही शब्दांहून अधिक वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४२ टक्के असल्याचे आढळून आले. 'स्कूल'चे हे सर्वेक्षण प्रामुख्याने लहान गावांमध्ये करण्यात आले होते, जिथे बालके प्रामुख्याने सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. करोनासाथीमुळे गेले जवळजवळ दीड वर्ष देशभरातील शैक्षणिक संस्था बंदच आहेत. करोना स्थिती सुधारल्याच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सप्टेंबरपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात येत आहेत. स्मार्टफोनअभावी शिक्षण थांबले गरिबी, इंटरनेटची जोडणी नसणे किंवा स्मार्टफोन नसणे ही यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BOIDbM
via nmkadda