Advertisement
शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले. कुर्ला येथील डॉन बॉस्को आयटीआय येथे हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात, तंत्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह, डॉन बॉस्को संस्थेचे प्रशासक फादर मॅकएन्रो लोपेज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युटी थेरपी, कुकींग, सायबर सिक्युरीटी, ग्राफीक डिझाईन, हेअर ड्रेसिंग अशा विविध ४५ क्षेत्रातील कौशल्ये राज्यातील युवक-युवतींमधील कौशल्य आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत २० हजार ०९० उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यातील जागतिक पातळीवर चांगली कामगिरी दाखवू शकतील अशा निवडक उत्कृष्ट २६३ युवक-युवतींची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे युवक-युवती पुढे राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या युवक-युवतींनी विविध ४५ क्षेत्रातील कौशल्यावर चमकदार अशी कामगिरी दाखवली आहे. ऑलिम्पिकच्या पद्धतीने युवकांची तयारी मंत्री मलिक म्हणाले की, ज्याप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करुन घेतली जाते, त्याच पद्धतीने या स्पर्धेत सहभागी युवक-युवतींची जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने तयारी करुन घेतली जाईल. यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व पाठबळ या युवकांना दिले जाईल. स्पर्धेत सहभागी तरुणांनीही जिद्दीने जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zNFbgV
via nmkadda