Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : तब्बल दीड वर्षांनी शाळांची दारे उघडल्यानंतर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वर्गात हजेरी लावण्याचा कल मोठा असला, तरी मात्र मुंबईतील अवघे २९ टक्केच विद्यार्थी प्रत्यक्ष शाळांमध्ये उपस्थित राहात आहेत. यात दक्षिण मुंबईतील शाळांमधील उपस्थिती कमी असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील आठवी ते बारावीच्या वर्गांत एकूण सात लाख २७ हजार विद्यार्थी हजेरीपटावर आहेत. या विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन लाख २८ हजार विद्यार्थी बुधवारी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहिले. दक्षिण मुंबईतील विविध शाळांमध्ये एक लाख ७२ हजार ६३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी फक्त ४१ हजार ९२९ विद्यार्थी बुधवारी प्रत्यक्ष शाळेत आल्याचे दिसून आले. उत्तर मुंबईत सर्वाधिक विद्यार्थी शाळांत आले आहेत. उत्तर मुंबईत दोन लाख १७ हजार एवढे एकूण विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक लाख सात हजार विद्यार्थी शाळेत आले. पश्चिम मुंबईत कॉलेजांची संख्या अधिक असल्याने पटसंख्या अधिक आहे. पश्चिम मुंबईत तीन लाख ३७ हजार ६९७ विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ ७८ हजार ९०४ विद्यार्थी शाळेत आले आहेत. करोनाचे संकट पूर्णतः निवळले नसल्याने अजूनही पालक भितीपोटी विद्यार्थ्यांना शाळांत पाठवत नसल्याचा अनुभव प्रशासनांनी नोंदवला. अधिकाधिक मुलांना शाळेत यावे, यासाठी स्थानिक प्रशासन तसेच शालेय शिक्षण विभागाने जनजागृती करावी, असे आवाहनही करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सोयीची सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, तरच प्रत्यक्ष उपस्थितीत वाढ होईल, असेही काही मुख्याध्यापक सांगत आहेत. दरम्यान, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत विद्यार्थी शाळांत येण्याचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत अधिक आहे. या परिसरात काही भागात पाचवी ते बारावी इयत्तांचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र एकूण पटसंख्येच्या तुलनेत अजूनही फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. काय आहेत अडचणी? - करोनाची भिती अजूनही पालकांच्या मनात कायम - स्थलांतर झालेले विद्यार्थी अजूनही शहरात परतलेले नाहीत - शिक्षण विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जनजागृतीचा अभाव - लोकल, बेस्टसह सार्वजनिक वाहतुकीच्या अडचणी - लस नसल्याने पालकांकडून मुलांना शाळेत जाण्यास मज्जाव - ऑनलाइन व ऑफलाइन दोन्हींची मुभा असल्याने परिणाम मुंबईतील आकडेवारी एकूण शाळा १,७७५ सुरू झालेल्या शाळा १,५१८ मुंबईतील एकूण शिक्षक ३५,५०८ शाळांत आलेले शिक्षक २६,२९२ सर्व शाळांतील एकूण विद्यार्थी मुले ३,८१,४५८ मुली ३,४५,८२२ एकूण ७,२७,२८० शाळेत येत असलेले विद्यार्थी मुले १,१७,०९७ मुली १,११,२९५ एकूण २,२८,३९२
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iL2VvF
via nmkadda