
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दिवाळीनंतर राज्यातील सर्व महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर आता लस न घेता ऑनलाइन अध्यापन करण्याची भूमिका घेणाऱ्या प्राध्यापकांचे पुढील महिन्यात वेतन रोखले जाणार आहे. याबाबत महाविद्यालयांना पत्र गेले असून, या प्राध्यापकांनी लस घेणे बंधनकारक असणार आहे. करोनामुळे दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरू होत आहेत. यासाठी लसीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र काही प्राध्यापकांनी लस न घेण्याचा पवित्रा घेत ऑनलाइन अध्यापन करण्याचाच निश्चय केल्याने प्राचार्यांसाठी ही मोठी डोकेदुखी झाली आहे. लस घेऊन कॉलेजला जाणे टाळण्याकडे काही प्राध्यापकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. कॉलेज सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना दोन्ही लसमात्रा घेणे सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही प्राध्यापकांनी जाणूनबुजून लस न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे आता त्यांना महाविद्यालयांमध्ये बोलावता येणार नाही. ज्यांनी वैद्यकीय कारणांमुळे लसीकरण केलेले नाही त्यांना यातून मुभा देण्यात आली आहे. पण असे कोणतेही कारण नसताना, केवळ लसीकरणाला विरोध अशी भूमिका घेत अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांनी कायमस्वरूपी ऑनलाइन शिकवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. या प्राध्यापकांनी आम्ही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये येण्यास तयार आहोत, मात्र लस घेणार नाही, असे प्राचार्यांना कळविले आहे. पण, सरकारी नियमांनुसार या शिक्षकांना लसमात्रा झाल्याशिवाय प्रत्यक्ष अध्यापनास परवानगी देण्यात येणार नाही. यामुळे या शैक्षणिक तासिकांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शाळा आणि महाविद्यालय प्रमुखांना पडला आहे. दरम्यान, याबाबत उच्च शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेत महाविद्यालयांकडून या महिन्याचे वेतन बिल पाठवताना लसीकरणाचा तपशीलही मागविला आहे. तसेच ज्या प्राध्यापकांनी अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल त्यांना लस घेण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यांनी लस न घेतल्यास पुढील महिन्यापासून त्यांचे वेतन रोखले जाईल, असे कॉलेजांना कळविल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FFjmTm
via nmkadda
0 टिप्पण्या