Advertisement

नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम अलीकडेच यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधन, नवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री यांनी यावेळी सांगितले. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन, सिकोया कॅपिटल इंडियाच्या मुख्य सार्वजनिक धोरण अधिकारी श्वेता राजपाल-कोहली आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री मलिक यावेळी म्हणाले की, स्टार्टअप्सला प्रोत्साहनासाठी विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना १५ लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी Startup Expo – VC Mixer हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या की आज जागतिक स्तरावरही आपल्या यशाची पताका झळकवत आहेत. राज्य शासन आणि स्टार्टअप परिसंस्थेतील भागधारक यांच्या संयुक्त भागीदारीने पारंपरिक तसेच नवीन काळातील क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी सिकोया इंडियाचा “सर्ज” उपक्रम व त्याची मार्गदर्शक पुस्तिका अतिशय उत्तम आहे. सर्वसमावेश पाठबळामुळे महाराष्ट्रातून येत्या काळात जास्तीत यशस्वी स्टार्टअप्स निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kEJeXe
via nmkadda