
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'नीट'चा निकाल जाहीर होऊन महिना झाला असला, तरी वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रियेला मुहूर्त मिळालेला नाही. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होईल, याकडे राज्यातील विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. प्रवेशप्रक्रिया राबविण्याबाबत केंद्र सरकारच्य़ा संस्थेकडूनच सूचना न आल्याने, प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) देण्यात आले आहे. एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश 'नीट'च्या गुणांनुसार होतात. 'नीट'चा निकाल साधारण महिन्यापूर्वी जाहीर झाला. आता डिसेंबर महिना उजाळल्यावरही प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होईल, य़ाबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती नाही. त्यामुळे प्रवेशांबाबत त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया देशपातळीवर साधारण एकाच वेळी होतात. त्याबाबत मेडिकल कौन्सेलिंग कमिटीकडून (एमसीसी) राज्यांना आवश्यक सूचना देण्यात येतात. या सूचना अद्याप न मिळाल्याने प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करता येत नसल्याचे सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच इंजिनीअरिंग, कृषी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत पहिली फेरी सुरू आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना सतावत आहे. कॉलेजांच्या नोंदणीमुळेही विलंब यापूर्वी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी न केल्यामुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत सीईटी सेलने कॉलेजांना सूचना केल्यानंतर कॉलेजांनी नोंदणी केली. त्यानंतरही मान्यतेच्या प्रक्रियेत असलेल्या राज्यातील काही कॉलेजांचा प्रवेशप्रक्रियेत समावेश झालेला नाही. त्यामुळे कॉलेजांना वेळेत नोंदणी न करण्यामुळेही प्रवेशप्रक्रियेला विलंब होत आहे. जानेवारीत कॉलेज सुरू? वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर साधारण महिनाभर सुरू असते. या प्रवेशप्रक्रियेत नोंदणी, गुणवत्ता यादी, अॅलॉटमेंट, प्रवेश घेणे असे विविध टप्पे असतात. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशप्रक्रिया सुरू राहिल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांचे कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आमची तयारी पूर्ण झालेली आहे; मात्र, केंद्रीय स्तरावरील 'एमसीसी'कडून अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करता येत नाही. प्रवेशप्रक्रियेबाबत सूचना मिळाल्या, की तातडीने वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. - आर. एस. जगताप, आयुक्त, सीईटी सेल
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IfIhyO
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या