कॉलेजांचे वर्ग, परीक्षा ऑनलाइन? कुलगुरूंच्या बैठकीतला सूर

कॉलेजांचे वर्ग, परीक्षा ऑनलाइन? कुलगुरूंच्या बैठकीतला सूर

मुंबई : राज्यातील कॉलेजे आणि विद्यापीठांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू राहणार की, बंद होणार याबाबतचा निर्णय आज, बुधवारी दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अध्यापन आणि पुढील परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात, असा सूर मंगळवारी ऑनलाइन स्वरूपात पार पडलेल्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कुलगुरूंच्या बैठकीत उमटल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईसह राज्यात वाढत असलेली करोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता, मुंबई महापालिकेने पहिली ते नववी आणि अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानुसार कॉलेजांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच सामंत यांनी रविवारीच याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजता सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये करोनाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षेबद्दल चर्चा केल्याचे सामंत यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले आहे. तसेच या बैठकीनंतर अंतिम निर्णय आज, बुधवारी दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या बैठकीत विद्यार्थ्यांची वसतिगृहे पुन्हा बंद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवण्याचा सल्ला या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर विविध विभागांतील जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यात चर्चा करून कॉलेज सुरू करण्याबाबत ठरविता येईल, अशीही चर्चा झाली. तसेच विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे आयोजन ऑनलाइन केले जावे, अशी सूचनाही यामध्ये देण्यात आली. मात्र, नेटवर्क नाही अशा भागांतील विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न समोर आला तेव्हा अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा करून कार्यवाही करावी, असे सूचित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात घेण्यात येणारा निर्णय सर्व सार्वजनिक विद्यापीठे, तसेच खासगी विद्यापीठे आणि कॉलेजांना लागू राहील, असेही यामध्ये ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये, यासाठी त्यांचे सतत समुपदेशन करण्याच्या सूचनाही यामध्ये मांडण्यात आल्या. या सभेचे इतिवृत्त मुख्यमंत्र्यांच्या अवलोकनार्थ सादर केले जाणार असून, त्यांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लसीकरणावर विशेष भर कॉलेजला जाणाऱ्या १८ वर्षांवरील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली होती. आता १५ ते १८ वयोगटातील मुलांनाही लसीकरणासाठी मुभा देण्यात आली आहे. यामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, अशी सूचनाही सामंत यांनी या बैठकीत केल्याचे समजते. 'युवास्वास्थ्य' या मोहिमे अंतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांचा तपशील सोपविल्यानंतर पुढील तीन त चार दिवसांत शिबिरे सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/colleges-in-maharashtra-likely-to-conduct-classes-exams-online-decision-today/articleshow/88703058.cms

0 Response to "कॉलेजांचे वर्ग, परीक्षा ऑनलाइन? कुलगुरूंच्या बैठकीतला सूर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel