SSC HSC Exam 2022: सवलतीच्या कलागुणांचा प्रश्न सुटला; क्रीडागुणांचे काय?

SSC HSC Exam 2022: सवलतीच्या कलागुणांचा प्रश्न सुटला; क्रीडागुणांचे काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये यंदा सवलतीच्या कलागुणांचा पेच सुटला असून, शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. दरम्यान सवलतीच्या क्रीडा गुणांसंदर्भात अद्यापही काही निर्णय झालेला नाही. मागील २ वर्षांत शाळाच बंद असल्याने दहावी व बारावीच्या या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्रीडाप्रकारात भाग घेणे, सहभाग दर्शविणे शक्य झाले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची चूक काय असा प्रश्न विद्यार्थी पालक व क्रीडा शिक्षकांकडूनही होत आहे. मागील वर्षभरात करोनाच्या कारणास्तव शाळा बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष क्रीडास्पर्धांत, प्रकारांत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र यामुळे ते दहावी बारावीच्या वर्षांत सवलतीच्या क्रीडागुणांपासून वंचित राहू नयेत अशी अपेक्षा क्रीडा व युवक सेवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यंदाच्या दहावी बारावी परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांना यापूर्वी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडाप्रकारांत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण द्यावेत आणि तयातही नियमावली जाहीर करावी अशी मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी हे नियम शिथिल करावेत अशी विनंती शालेय शिक्षण विभागाकडे पत्र लिहून केली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या यापूर्वीच्या शालेय शिक्षणातील वर्षांत आयोजित क्रीडास्पर्धांतील त्यांचा सहभाग विचारात घेऊन २०२०-२१ करिता सवलतीचे क्रीडागुण देण्याचे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे ते निर्देश २०२१-२२ साठीही द्यावेत अशी विनंती त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना केली आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-how-students-will-get-sports-quota-marks-as-there-was-no-participation-in-sports-due-to-corona/articleshow/89085245.cms

0 Response to "SSC HSC Exam 2022: सवलतीच्या कलागुणांचा प्रश्न सुटला; क्रीडागुणांचे काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel